Sunday, July 12, 2020

'चित्ती असू द्यावे समाधान!'



 सकाळी उठल्यावर सांप्रत  प्रथेनुसार 'कराग्रे मोबाइल' घेताच एका नव्या 'डे' ची माहिती मिळाली....'नॅशनल सिम्पलिसिटी डे'!(१२जुलै - वर्ल्ड सिम्पलिसिटी डे)

असाही डे असतो? का असतो? 

तर हा 'साधेपणाचा दिवस' साजरा केला जातो महान अमेरीकन कवी, लेखक, इतिहासकार अन् तत्ववेत्ता हेनरी डेविड थोरो यांच्या सन्मानार्थ! (जन्म १२/जुलै /१८१७)
त्यांनी त्यांच्या 'वॉल्डन' या प्रसिध्द पुस्तकातून 'मिनिमलिझम' म्हणजेच 'कमीत कमी वस्तूंसह जीवनशैली' चा पुरस्कार केला. कमीत कमी गरजा ठेवून पर्यावरणाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
एका इन्फोटेन्मेन्ट चॅनलवर मिनिमलिझमचा स्वीकार करत बरेच अमेरीकन नागरिक त्यांच्या 'टायनी हाऊस' मध्ये केवळ आवश्यक सामुग्रीसह जास्त आनंदात आयुष्य घालवताना दाखवले जातात.
"साधेपणातलं सौंदर्य" किंवा  "सादगी मे ही सुंदरता होती है!" हे  वाक्य आपण ऐकलं असेलच. मात्र गेल्या काही वर्षांत आपण तो साधेपणाच विसरलोय. साधेपणा.... दिसण्यातला, असण्यातला, वागण्यातला, जगण्यातला!
  आपण जसे दिसतो तसेच आपण स्वत:ला स्वीकारतो का? तर नाही. स्वतःचा स्वीकार न केल्याने कितीतरी लोक न्यूनगंडात जगतात. मग आपलं 'दिसणं' आकर्षक करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. बाह्य मेकअप हा त्यात आघाडीवर आहे. आताशा प्रत्येक लग्नकार्यात  नवरीला टिपिकल मेकअप आणि हेअरस्टाइल करून तिचं मूळ सौंदर्यच झाकोळून टाकलं जातं. 
 तसंच आपण जसे आहोत, जाड/बारीक, उंच/ठेंगणे, काळे/गोरे, तरुण/वयस्कर, गरीब/श्रीमंत ह्या गोष्टींचा स्वीकार न केल्याने सुध्दा कित्येक जणांना न्यूनगंड किंवा अहंकार ग्रासतो. 
जे जसं आहे तसं स्वीकारलं तर जगणं जास्त सोपं होईल.
 प्रत्यक्षात मात्र काही 'माजी सौंदर्यवती' गुजरा हुआ जमाना दोबारा आणण्यासाठी चेहऱ्याची जी काही रंगरंगोटी करतात त्यात सुंदर न दिसता भेसूर दिसतात, हे त्यांना कोणी सांगावं?
वय वाढणारच! त्यासोबत वयवाढीच्या खुणाही शरीरावर दिसणारच! त्या सगळ्याचा ग्रेसफुली स्वीकार केला तर जगणं जास्त सोपं आणि सुंदर होईल. साधं राहणं म्हणजे काही गबाळेपणाने राहणं नाही. केवळ रोजच्या जगण्यात टापटीप राहूनही इच्छित प्रभाव पाडता येतो.
     बऱ्याच लोकांच्या वागण्यातही सहजता, साधेपणा नसतो.
आपण म्हणजे कोणीतरी विशेष असल्याचा त्यांचा ठाम समज असतो. हाच समज समोरच्यापर्यंत पोहचवण्यासाठी, समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी (हो, कारण 'फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन' हे वाक्य त्याला पाठ असतं)हा स्वतः ब्रँडेड कपडे, शूज, ॲक्सेसरीज, गॅजेटस् यांनी स्वतःची इमेज बनवू पाहतो. पण या सगळ्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. "ऋण काढून सण साजरे करु नये" हे वडीलधाऱ्यांनी सांगितलेलं असतं. पण त्या पोकळ दिखाव्यासाठी  प्रसंगी कर्ज घेतलं जातं. क्रेडीट कार्डवरुन शॉपिंग केल्यास संबंधित बँकेचे वसुली कर्मचारी जीव नकोसा करतात. म्हणजेच आर्थिक, मानसिक ताणतणावासोबतच सामाजिक स्वास्थ्यसुध्दा गमावलं जातं.
खरंच का साधं जीवन जगणं एवढं अवघड असतं? आपल्या गरजा (need) आणि इच्छा (want) यात काय महत्वाचं ते आपल्याला कळतच नाही का?
हवं ते मिळवण्यासाठी, जे मुळात नाही ते दाखवण्यासाठी, ऊर फुटेस्तोवर धावणारं जग जरा स्लो झालं ते लॉकडाऊनमुळे!
खरं तर या लॉकडाऊनच्या काळात आपल्याला याचा प्रत्यय आला असेलच की 'जगण्यासाठी' फार थोडा पैसा लागतो. खर्च तर 'जीवनशैली'साठी केला जातो. या लॉकडाऊन दरम्यान आपण ज्याला आनंद, मजा, सुख समजत होतो अशा कितीतरी गोष्टींशिवाय आपण जगू शकतो, हे कळलं!
हॉटेलिंग, मॉल्स, थिएटर बंद झाल्याने आयुष्यातला आनंदच संपला, असं नाही. (ज्यांची उपजिवीका यावरच अवलंबून आहे त्यासर्वांबद्दल सहानुभूती आहेच 🙏)
"साधी राहणी अन् उच्च विचारसरणी" हे सूत्र आयुष्य साधं, सोपं आणि सुखकर बनवतं. फक्त अजून जास्त पैसे, इतरांना दाखविण्यासाठी ओढूनताणून केलेला मोठेपणा, हे सर्व सोडून ...
"चित्ती असू द्यावे समाधान!"

श्वेता पांडे - चिमोटे
   
  

मी संसार माझा रेखिते

  "दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेऽऽखिते..."   सुखी संसार मांडण्याची, तो नीटनेटका, आखीवरेखीव करण्याची स्वप्नं थोड्याफार फ...