Sunday, June 28, 2020

दिसतं तसं नसतं



आज मला 'दिसतं तसं नसतं' या उक्तीचा प्रत्यय आला. आज एका आजीबाईंनी banket उपस्थित सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. 
 झालं असं की मी दुपारी काही कामानिमित्त banket गेले होते. Banket नुतनीकरणामुळे सर्व कारभार लहानशा कोप-यात हलविण्यात आला होता. साहजिकच तेवढ्याशा जागेत कर्मचाऱ्यांना आणि banket येणाऱ्या लोकांना adjust करावे लागत होते. Banket deposit आणि withdrawal साठी येणाऱ्यांची रांग मुंगीच्या गतीने पुढे सरकत होती. अचानक माझ्या समोर एक लौकिक अर्थाने कु रु प वृध्दा आली. तिला पाहून मला काही महिन्यांपूर्वी सोशल मिडिया गाजवणारी "राणू मोंडल" आठवली. (आता ही राणू मोंडल कोण? ती रेल्वे स्टेशनवर गाणी म्हणणारी भिक्षेकरी जिला हिमेश रेशमियाने 'रास्तेसे उठाके रातोरात स्टार बनाया' तीच) 
हं....तर मी सांगत होते ती स्त्री सुध्दा तशीच 'रास्तेसे आयी हुई' गरीब बिचारी दिसत होती. पांढरे कम् भुरकट मोकळे केस, कशीबशी गुंडाळलेली साडी, रखरखीत पायात सरकवलेली स्लिपर चप्पल अन् हातात कागदपत्रांच्या ओझ्याने फाटलेली पिशवी! माझ्या पासून सहा सात जणांच्या अंतरावर ती बसली होती. तिच्या अवतीभवती नुकत्याच आलेल्या सुस्वरूप, सुस्थितीतील तिघी चौघी बसल्या होत्या. आजीबाईंनी पेन मागितला. माझी पर्स उघडायच्या आत एकीने तिला पेन दिला. पेनवालीला वाटलं आता ही आपल्याला 'form कसा भरू?' हे विचारेल. पण झालं भलतंच! आजीने जवळचं पासबुक काढून भराभरा form भरलाच वर झोकात इंग्लिश मध्ये सही सुध्दा केली. त्या सुस्वरूप स्त्रीने लगेच "दिसतं तसं नसतं" म्हंटल अन् 'आपल्याला कसा अजूनही bankecha form वगैरे भरताना इतरांची मदत घ्यावी लागते' ह्याची कबुली दिली. माझा नंबर आल्याने आजीबाईंनी अजून कुणाकुणाला आणि कसे कसे आश्चर्याचे धक्के ते कळलं नाही. पण "दिसतं तसं नसतं" हे मात्र खरं!

© श्वेता चिमोटे

Saturday, June 27, 2020

डॉ. आयडा स्कडर

पुस्तकाचे नाव - डॉ. आयडा स्कडर
लेखिका - वीणा गवाणकर
प्रकाशन - राजहंस प्रकाशन

मिशनरी धर्मप्रसारक कुटुंबात जन्मलेली एक मुलगी - आयडा! बालपणातील काही वर्षे हिंदुस्थानात काढल्यावर अमेरिकेत आपल्या आजोबांकडे गेली. अमेरिकेतच लहानाची मोठी झाली. शिकली. त्यादरम्यान तिची मिशनरी आई भारतातच तिदीवनम् (तामिळनाडूतील एक गाव) येथे राहून गावकऱ्यांना धर्माच्या गोष्टी सांगत होती तर वडील Dr. John Scuder वैद्यकीय सेवा पुरवत होते.
    आयडा वीस वर्षांची असताना तिच्या आईची तब्येत बिघडली. तिच्या आईची सेवा करायला म्हणून ती अमेरिकेतून भारतात आली. इथली गरीबी आणि उपाशी जनता तिला बघवत नव्हती. त्या सगळ्यांची घृणा वाटून तिला अमेरिकेत परत जायचे होते. तिने ठरवलं की आई बरी झाल्यावर आपण लगेच अमेरिकेत परतायचं. लग्न करायचं, आपला संसार थाटायचा. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 
 तिदीवनम् मध्ये कसेबसे दिवस रेटत असताना एका रात्री तिच्या दारावर थाप पडली. एक तामिळ ब्राह्मण युवक आपल्या चौदा वर्षांच्या गर्भवती पत्नीची सुटका करण्यासाठी एका स्त्री डॉक्टरच्या शोधात तिच्या दारी आला होता. तिने सांगितले की मी नाही पण माझे वडील डॉक्टर​ आहेत. नंतर एक मुस्लिम आला. त्याला आपल्या प्रसुती वेदनांनी तडफडणा-या पत्नीसाठी डॉक्टर महिलेची गरज होती. त्यानंतर गावचा प्रमुख मृत्युशय्येवर असलेल्या आपल्या पत्नीवर उपचारासाठी स्त्री डॉक्टरच्या शोधात तिच्या दारी आला होता. त्या तिघांनाही आयडाने सांगितले की तिचे वडील Dr. John Scuder त्या रुग्ण स्त्रियांवर उपचार करतील. मात्र आपल्या पत्नीला परपुरुषाने स्पर्श करण्यापेक्षा ती मेली तरी चालेल, असे त्या तिघांचेही ठाम मत होते.
आणि झालंही तसंच! एकाच रात्री तिदीवनम् अर्थात चिंचबनातील त्या तीन स्त्रिया केवळ महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याने मरण पावल्या. ह्याची प्रचंड टोचणी आयडाला व्यथित करु लागली. तिने दुसऱ्याच दिवशी सकाळी आईवडीलांना, ती अमेरिकेत जाऊन डॉक्टर होणार असल्याचं कळवलं. शिक्षण संपवून तिला भारतात परतायचं होतं, इथल्या स्त्रियांची सेवा करण्यासाठी!
  उदारमतवादी अमेरिकेतही त्याकाळी अविवाहित स्त्रीला डॉक्टर म्हणून मिशनरी कामावर पाठविण्यास विरोध होता. मात्र केट फ्रेलिंगसन नावाच्या एका बंडखोर स्त्रीनेच आयडाच्या जनसेवेसाठी medical college आणि मिशन बोर्डाशी वाद घालून तिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. शेवटी १८९६ साली आयडा 'women's medical college, Philadelphia' या अमेरिकेतील महिला डॉक्टर्स घडविणा-या आद्य संस्थेत प्रवेश घेतला. हेच ते महाविद्यालय जिथून भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी १८८० साली पदवी प्राप्त केली.
वैद्यकीय शिक्षणाचा पिंड नसलेल्या आयडाने केवळ आपले ध्येय डोळ्यांपुढे ठेवून हा अभ्यासक्रम परीश्रमपुर्वक पुर्ण केला. आपल्या तारुण्यसुलभ भावनाही तिने आपल्या ध्येयाच्या आड येऊ दिल्या नाही. आजन्म अविवाहित राहून तिने भारतीयांची सेवा केली. स्वतःच्या वाहनाने ग्रामीण भागातील रुग्णांना तपासण्यासाठी न थकता जात राहिली. फक्त वैद्यकीय सेवाच नाही तर भारतीय मुलींसाठी मेडिकल स्कूल ही सुरू केलं. 
पुढे वेल्लोर (तामिळनाडू) येथे सहशिक्षण असलेलं medical college ही सुरू केलं. ग्रामीण विभागात डॉक्टर्स नेण्याचा प्रयत्न जगात प्रथमच डॉ. आयडा स्कडर यांनी केला. त्यांना तत्कालीन इंग्रज सरकारने 'कैसर - ए - हिंद' हा किताब बहाल केला. 
डॉ. आयडा स्कडर म्हणतात," भ्रामक समजुती, अंधश्रद्धा, रुढी यांनी घेरुन असणा-या, परंपरेला बळी पडणाऱ्या लोकांना दोष देण्यात काय अर्थ? दोष असतो त्यांचा, ज्यांना उपाय माहीत आहेत पण ते अंमलात आणण्यासाठी जे दक्ष नाहीत त्यांचा!"
ह्या प्रेरणादायी चरित्राचा हिंदी अनुवाद प्रतिमा डिके यांनी "एक महान साधिका की कहानी" या नावाने केला आहे.
डॉ. आयडांबद्दल अतिशय कमी माहिती उपलब्ध असतानाही वीणा गवाणकरांनी हे चरित्र खूप परीणामकारकपणे मांडलंय.

© श्वेता चिमोटे.

अजित डोवाल

 अजित डोवाल
गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
एका गुप्तहेराची चित्तथरारक कहाणी

लेखक - अविनाश थोरात

तुम्ही अभिनेता अक्षयकुमारचा बेबी हा सिनेमा पाहिलाय का? ह्यात एका प्रसंगात गुप्तहेर असलेल्या अक्षयकुमार समोर मंत्रीमहोदय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराजवळ मिशनच्या यशस्वितेबाबत शंका उपस्थित करतात. सुरक्षा सल्लागार अतिशय शांतपणे "अगर अजयको (अक्षयकुमार) कुछ हो जाता है तो we will disown him!" असं सांगतात. आणि महदाश्चर्याची गोष्ट अशी की तो गुप्तहेरही ही गोष्ट तितक्याच थंडपणाने स्वीकारतो.
 पकडले गेल्यास देशाकडून आपले अस्तित्वच नाकारले जाईल. कितीही उच्च कामगिरी केली तरी त्यासाठी कधीही गौरव होणार नाही. हे माहीत असूनही देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या गुप्तहेरांच्या अज्ञात जगाची तोंडओळख आपल्याला अजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - एका गुप्तहेराची चित्तथरारक कहाणी या छोटेखानी पुस्तकातून होते.
हे पुस्तक जरी 'चरीत्र' या सदरात मोडणारे वाटले तरीही ते रुढार्थाने चरीत्र नाही. अजित डोवाल यांच्या कारकीर्दीतील काही महत्त्वाचे अंशमात्र आहे.
   एका गुप्तहेराच्या कामगिरीबद्दल फार माहिती नसणे यातच त्याचे खरे यश सामावलेले असते. म्हणूनच गुप्तहेर डोवाल यांच्याबद्दल सामान्य माणसाला माहिती नाही. मात्र इंटेलिजन्स ब्युरोमधून निवृत्त झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण या क्षेत्रामध्ये काम सुरू केले. हेरगिरी ते मुत्सद्देगिरी या प्रवासात अजितकुमार डोवाल यांनी देशासाठी केलेल्या कामगिरीची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी पत्रकार, लेखक अविनाश थोरात यांनी हे पुस्तक लिहिले. अविनाश थोरात हे सध्या 'लोकमत'च्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत. समाजकारण, राजकारण तसेच अंतर्गत सुरक्षा हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.
    उत्तराखंड राज्यातील पौरीगढ़वाल येथे जन्मलेल्या डोवाल यांनी आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते भारतीय पोलिस सेवेत रुजू झाले. केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील थ्यालसेरी येथे सेवेत असताना दोन धर्मांमध्ये उसळलेल्या दंगलीला त्यांनी अतिशय कौशल्याने नियंत्रणात आणले. त्यासाठी त्यांना बढती मिळून  जिल्हा पोलिस अधीक्षक हे पद मिळणार असताना त्यांनी ते नाकारुन इंटेलिजन्स ब्युरोत प्रवेश केला.
  ब्रिटीशांनी १८८५ मध्ये स्थापन केलेली इंटेलिजन्स ब्युरो ही भारतातील सर्वात जुनी संस्था आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याची पुनर्रचना करण्यात आली. गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी ही संस्था प्रामुख्याने भारतविरोधी कारवाया करणाऱ्या संघटनांची माहिती काढते. आपल्या खब-यांच्या साह्याने देशांतर्गत गुप्त माहिती संकलन आणि विश्लेषण यासह इंटेलिजन्स ब्युरोचे सीमावर्ती भागातही लक्ष असते. इंटेलिजन्स ब्युरोसाठी स्वतंत्र नियुक्त्या होत असल्या तरी आयबीतील प्रमुख अधिकारी हे पोलिस दलातील (आयपीएस) अधिकारी असतात. आयबीचा प्रमुखही भारतीय पोलिस दलातीलच ज्येष्ठ अधिकारी असतो. संपूर्ण देशात विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना इंटेलिजन्स ब्युरोमध्ये समाविष्ट केले जाते. त्यासाठी त्यांना अनेक परीक्षांमधून जावे लागते. त्यांना साध्या वेशात गुप्त माहिती गोळा करावी लागते. त्याकरिता त्यांना ड्रगमाफियांपासून दहशतवाद्यांपर्यंत सर्वच ठिकाणी आपली खरी ओळख उघड न होऊ देता वावरावे लागते. प्रसंगी वेशांतरही करावे लागते. 
   अजित डोवाल यांची गुप्तहेर म्हणून प्रथम नियुक्ती झाली ती मिझोरामची राजधानी ऐझवाल येथे. तेथे त्यांना मिझो बंडखोरांपर्यंत पोहचून त्यांना भारत सरकारसोबत समझोता करार करण्यासाठी तयार करायचे होते. केवळ परिवारच नाही तर आर्मीच्याही संपर्कात त्यांना राहता येणार नव्हते. मिझो बंडखोरांच्या विश्वास संपादनासाठी त्यांनी स्वतःची प्रतिमा खतरनाक बंडखोर अशी तयार केली. लष्करी अधिकाऱ्यांनी तर त्यांना खरेच बंडखोर समजून संपवण्याची तयारीही केली होती. नंतर त्यांना डोवाल हा आपलाच माणूस असल्याचे कळले आणि डोवाल वाचले. तसेच डोवाल यांनी सिक्कीम राज्याच्या विलिनीकरणासाठी सुध्दा महत्वपूर्ण कार्य केले. 
भारत - पाकिस्तान संबंधांबद्दल नव्याने सांगायला नको. पाकिस्तानात नियुक्ती होणे ही कोणत्याही गुप्तहेरासाठी सर्वात मोठी संधी आणि आव्हानही असते. अजित डोवाल पाकिस्तानात सात वर्षे राहिले. पाकिस्तानाच्या अणुकार्यक्रमाची माहिती पुरवणे आणि खलिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात राहून भारताला त्यांच्या कारवायांबद्दल जागरुक करणे, ही महत्त्वाची कामगिरी डोवाल यांनी बजाविली.
Operation Black thunder च्या वेळी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपलेल्या अतिरेक्यांना आपण ISI चे एजंट असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना आत्मसमर्पण करण्यास राजी केले. ह्या कारवाईत त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी डोवाल यांना कीर्तिचक्र प्रदान करण्यात आले. कीर्तिचक्र मिळवणारे देशातील ते एकमेव पोलिस अधिकारी आहेत.
    कंदाहार विमान अपहरण प्रकरणी भारताचे कमीत कमी नुकसान होऊन प्रवासी सुखरुपपणे कसे परत येतील ह्याला प्राधान्य दिले.
पुढे कारगिल, operation दाऊद इब्राहिम,इशरत जहान प्रकरण आणि अन्य प्रकरणांमधून अजित डोवाल यांच्या कामगिरीची माहिती मिळते. 
  पठाणकोट हल्ला आणि उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकमुळे देशवासियांमध्ये राष्ट्रभावना निर्माण झाली.  बचावात्मक आक्रमणाचा सिध्दांत अजित डोवाल यांनी मांडला. दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आता defensive offence (बचावात्मक आक्रमण) चा पवित्रा घेतला आहे.
पुस्तक छोटेखानी असले तरी माहितीपूर्ण आहे. 

© श्वेता  चिमोटे

Happy mother's day!



एका शहरातील एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एक हाय प्रोफाइल लाईफ कोच कंपनीच्या एम्प्लॉइजना आयुष्यात परिवाराचे आणि आईचे महत्त्व समजावून सांगत होता. प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि स्वतः मध्ये  सकारात्मक बदल घडवा वगैरे वगैरे....
मात्र त्याचा फोन खणखणला की तो डिस्टर्ब व्हायचा. लंच ब्रेक मध्ये आयोजक आणि इतरांसोबत गप्पा मारताना त्याचा फोन पुन्हा वाजला. आता मात्र त्याने चिडूनच दबक्या आवाजात फोन उचलला, "काय चाललंय आई तुझं? माझी महत्वाची मिटींग सुरू आहे. बोल पटपट!"
"काही नाही रे बाळा! आज मदर्स डे म्हणून मी तुझ्या फोनची वाट बघत होते एवढंच!"

- श्वेता चिमोटे

जगण्याची वारी

"झालं का तुझं सगळं आवरून? निघू आता", बबन सारखा आतबाहेर करत सुनंदाला घाई करू लागला. कालच रामूभैया आणि छोटूशी बबनचं बोलणं झालं होतं. 
"ये बीमारी बहोत खतरनाक है. अब कंपनीमें फिर कब काम शुरू होगा क्या पता?" रामूभैया बोलत होता. तो वाट्टेल ते करून युपीला परत जाण्याबद्दल आग्रही होता. छत्तीसगडचा छोटू ही आपलं किडूकमिडूक आवरून पायी गावाकडे जायची तयारी करून होता. कारण रेल्वे आणि बसेस सगळंच लॉकडाऊनमुळे बंद होतं. सरकार सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा आग्रह धरत होती. लोकांना जमावबंदी करण्यात आली होती. विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी प्रसाद द्यायला सुरुवात केली होती. नव्याने आलेल्या या  कोरोना नावाच्या विषाणूशी कसा सामना करावा हे कुणालाच कळत नव्हतं. त्यावर काही औषधोपचारही उपलब्ध नव्हते.  लहानशा जागेत दाटीवाटीने राहणा-या गरीबांना सोशल डिस्टंसिंग समजत नव्हतं. तसं ते शिकलेल्या लोकांना तरी कुठे पुरतं कळलं होतं म्हणा! काही महाभाग पत्ते आणि क्यारमचे डाव मांडून लॉकडाऊन साजरा करत होते. या पंधरा​ दिवसांत आयुष्य एकदम बदलून गेलं होतं.
 अचानक सुनंदाच्या आवाजाने बबनची तंद्री भंगली. "अवो पन आकाशची खेळणी अन् अभ्यासाची पुस्तकं बांधायची बाकी हायेत अजून." तिला पायी जायचं असलं तरी काडीकाडीने जमवलेल्या संसाराचा, वस्तूंचा मोह सुटत नव्हता. काय काय घेऊ असं तिला झालं. तिचा जीव हौसेने घेतलेल्या त्या प्रत्येक वस्तूत अडकला होता.  सुनंदाने बांधलेल्या तीन चार गाठोड्यांकडे बघत बबन रागावला,"तू तर समदं आसं बांधू रायली जसं तुझ्या बानं टरकंच धाडलाय! ठून दे ते खेळणे अन् बुकं....जित्ते 
-हाऊ तर खेळेन अन् शिकेन नं पोरगं ?!" हे ऐकून सुनंदाच्या डोळ्यांना धारा लागल्या. यांत्रिकपणे ती कपडे, भांडी आणि शिधा बांधू लागली. जास्तीचं सामान वस्तीत राहणा-या मुलांमध्ये वाटून दिलं. तिने आकाशला थोडंफार खाऊ घातलं आणि चटणी भाकरी एका कापडात बांधली. आता जे इतरांचं होईल तेच आपलंही, अशी मनाची समजूत घालत तिने घराला शेवटचा नमस्कार केला. बबननेही जड मनाने दोन खांद्यावर दोन गाठोडी घेतली आणि तिसरं गाठोडं डोक्यावर ठेवत शेजारच्या  संज्याचा निरोप घेतला. कदाचित शेवटचा.......
दहा वर्षांपूर्वी बबन विदर्भातील एका खेड्यातून पुण्यात कामाच्या शोधात आला होता. एका नामांकित कंपनीत लेबर म्हणून काम करू लागला. लवकरच घरच्यांनी पोरगं कमावतं झालं तसं दोनाचे चार हात करून दिले. पुढे त्याला सुपरवायझर म्हणून प्रमोशनही मिळाले. वर्षभरात बबन्याचा बबनराव झाला. काही महिन्यांनी घरातही त्याला बाप म्हणून  बढती मिळाली. कंपनीतून आल्यावर छोट्या आकाशशी खेळण्यात तो रंगू लागला. बबन आणि सुनंदाचा सुखाचा​ संसार सुरू झाला.
 शेजारी युपी, बिहार आणि छत्तीसगड मधून आलेल्या मजदूरांची घरं होती. ते सर्व लोकही रोजगाराच्या शोधात पुण्यात येऊन दाखल झाले होते.
 पुणे आणि परिसरात  निर्माण झालेल्या ऊद्योगधंद्यांमुळे देशभरातील अनेक सुशिक्षित तरूणांना जशा करीयरच्या संधी निर्माण झाल्या. तसाच अल्पशिक्षितांनाही रोजगार मिळाला होता.  सगळं कसं सुखासुखी चाललं होतं.
 बबनचा मुलगा आकाश सुध्दा पालिकेच्या शाळेत जाऊ लागला. सुनंदाही घर सांभाळून शिवणकाम करत संसाराला हातभार लावत होती. इतरांचे संसारही थोड्याफार फरकाने बबन आणि सुनंदा प्रमाणेच बहरत होते. 
बबनचे आईवडील खूप धार्मिक होते. शेगावच्या गजानन महाराजांवर त्यांची दृढ श्रध्दा होती. ते गावाकडे राहून शेती करत होते. 
 फेब्रुवारी - मार्च महिन्यात परदेशातून येणाऱ्या
कोविड १९ च्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना श्वसनास त्रास होणे, खोकला, ताप, थकवा अशी लक्षणे दिसू लागली. हा संसर्गजन्य आजार असल्याने आठ पंधरा दिवसांतच ह्या आजाराने कितीतरी लोकांना घेरले. रोगाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला. रुग्णसंख्या वाढल्याने सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. तसा लॉकडाऊन जगभरात आधीच सुरू झाला होता. लोकांना फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीच घराबाहेर निघायची परवानगी होती. कदाचित अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल, या भितीने ज्यांना परवडत होतं त्यांनी घरात अन्नधान्य आणि इतर किराणा मालाचा वारेमाप साठा करून ठेवला. गरीबांसाठी स्वस्त धान्य दुकानांतून प्रशासन सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरीत करत होते. मात्र प्रचंड लोकसंख्येच्या तुलनेत ते कमी पडत होतं.
 काम बंद झाल्याने सुरुवातीला फक्त काही दिवसांचा वाटणारा हा प्रश्न इतका व्यापक असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. मात्र हळूहळू दळणवळणाची साधने ठप्प झाली. रेल्वे आणि बसेस सुरू असताना परगावातून आलेले लोक गावी परतू लागले. पण तिथेही मरणाची गर्दी! बबन ती गर्दी पाहून बायको पोराला घेऊन ह्या गर्दीत आपली ताटातूट होईल, ह्या भितीने रोज रेल्वे स्टेशनहून निराश होऊन परतायचा. त्याला वाटलं, काही दिवसांत ही गर्दी ओसरली की जाऊ गावाकडे पण........ अचानक सरकारने​ कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व रेल्वेगाड्या​ आणि बसेस बंद करण्याचे आदेश दिले. आता जिल्ह्याची सीमा ओलांडायला पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार होती. या काळात डॉक्टरांच्या सोबतीला पोलिस प्रशासन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचं काम वाढलं होतं.
 प्रायव्हेट गाडी करून जाण्याएवढी बबनची आर्थिकस्थिती चांगली नव्हती. गावी शेतीसाठी पैसा पुरवताना त्याच्या हाती विशेष अशी शिल्लक उरत नव्हती. म्हणूनच रामूभैया आणि छोटू सारखाच तोही पायी चालत गाव गाठण्यासाठी निघाला. त्याच्या मागेपुढे​
चालणा-यांची खूप मोठी रांग होती. ती पाहून त्याला पंढरीला जाणा-या 
   वारक-यांची आठवण आली. फरक एवढाच होता की वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीत जातात, तर इथे हे सगळे जीव वाचवण्यासाठी निघाले होते!
संध्याकाळपर्यंत पावलं ओढत बबन नगरला  पोहचला. त्याच्या सोबत विदर्भातील बरेच लोक असल्याने त्याला हायसं वाटलं. जसजसा अंधार पडू लागला तसे लोक रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतांमध्ये विसावू लागले. जवळपासच्या​ विहीरीतून पाणी काढून तीन दगडांची चूल मांडली. स्त्रियांनी​ स्वयंपाक केला. दुसऱ्या दिवशी पहाटेच सगळे पुन्हा गावची वाट चालू लागले. 
चालत चालत औरंगाबादमध्ये​ दाखल झाले. 
एव्हाना टिव्हीवर ह्या पायी प्रवाशांच्या बातम्या झळकू लागल्या. त्यांचा रणरणत्या उन्हात कुटुंबासह मैलोनमैल केलेला प्रवास अनेकांच्या मनात करुणा निर्माण करत होता. काही स्वयंसेवी संस्था आणि गावकरी ह्या लोकांना जेवण पुरवत होते. कोणी त्यांच्या झिललेल्या टाचांना थोडा दिलासा मिळावा म्हणून चपला देत होते. 
कुठे खाण्यापिण्याची सोय होत होती तर कुठे या अनोळखी लोकांना चोर समजून हुसकावून लावले जात होते. तर कुठे ह्या पाठीवर बि-हाड घेऊन निघालेल्या लोकांचच सामान पळवलं जात होतं. देशभरातील मजदूरांची हीच कहाणी होती.
 बबन आणि इतर लोक जिथे मोबाईलला रेंज मिळेल तिथून परराज्यातल्या आपल्या मित्रांची चौकशी करत होते. त्यांना तर किती दिवस चालावं लागणार होतं, देव जाणे! पण प्रत्येक जण हिमतीने पुढचं पाऊल टाकत होता.
 आपत्तीत माणसाच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू दिसून येत होते. 
मजल दर मजल करत पाच सहा दिवसांची पायपीट करत बबन अन् त्याचे साथीदार विदर्भाच्या सीमेजवळ पोहोचले.  चिखलीच्या पुढे माळरानावर विसावा घ्यायला मंडळी थांबली. बबन आणि सुनंदा  आकाशला मध्ये घेऊन झोपी गेले. तेवढ्यात "चोरsss  चोरsss पकडाsss पकडाss" असा आवाज आला.    लॉकडाऊनमध्ये मध्यमवर्गीय माणूस घरात कोंडला गेला असला तरीही हातावर पोट असलेल्या गरीबांना दोन वेळच्या अन्नासाठी हातपाय चालवावे लागत होते. त्यातूनच चोरी, लुटालूट यासारख्या घटना घडू लागल्या.
आताही अशाच चोराच्या शोधात गावकरी या माळरानावर आले. बबन आणि त्याचं कुटुंब इतर साथीदारांपासून थोडं दूर होतं. गावकऱ्यांनी बबनलाच चोर समजून मारहाण केली. सर्व लोक ह्या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरून गेले. सुनंदाने गावकऱ्यांच्या हातापाया पडून बबनची सुटका करवून घेतली. 
दुसऱ्या दिवशी सकाळी बबनला साधं चालणंही कठीण झालं. आता सामानसुमान घेऊन चालणं शक्यच नव्हतं. बबनची अवस्था बघून सुनंदा रडू लागली. आकाशही काही न समजून रडू लागला.
 तेवढ्यात तिला भाज्यांचा टेम्पो जाताना दिसला. तिने धावत जाऊन त्या टेम्पोला थांबवलं. तिची व्यथा त्या टेम्पोवाल्याला सांगितली. त्यानेही त्या तिघांना आपल्या गाडीतून त्यांच्या गावी पोहचवले.
  बबन आणि सुनंदा पुण्याहून निघाल्यापासून गावी त्याचे आईवडील अधीरतेने त्यांची वाट बघत होते. टिव्हीवरच्या बातम्यांनी त्यांची काळजी गहिरी होत होती.
 बबनला इतक्या हाल अपेष्टांमधून परत आलेलं बघून त्यांचे डोळे घळाघळा वाहू लागले.
 बबनला तर हा चमत्कार वाटला. आपल्या देवभोळ्या आईवडीलांच्या पुण्याई मुळेच आज आपण जिवंत आहोत असं त्याला मनोमन वाटू लागलं. तो लहान मुलासारखा हमसून हमसून रडू लागला. आणि बाबांना म्हणाला, "बाबा, तुमी शेगावची पायी वारी करता. गजानन महाराज तुमाले वारीत संगं संगं चाल्तानी दिसतात न.... पन आज बाबा मी या जगण्याच्या वारीत त्यांना लय खेप भेटलो. ते वेगवेगळ्या रुपात मला मदत करत व्हते. या टेम्पोवाल्याच्या रुपात तुमच्या महाराजांनीच मला अन् तुमच्या सुनेला, नातवाला इथंवर आनलं बाबा!" 
बबन, सुनंदा आणि त्याच्या आईवडीलांनीही साश्रू नयनांनी त्या टेम्पोवाल्याचे आणि देवाचे आभार मानले.

- श्वेता चिमोटे

वाटाघाटी

तीन महिने....बरोब्बर तीन महिने झाले त्या राक्षसाला देशात शिरून! आता ह्या राक्षसाला हरवण्यासाठी वारंवार हात धुणे, मास्क लावणे, हात आणि वस्तू sanitize करणे, शारीरिक अंतर राखणे ही यादी एव्हाना पाठ झालीय सगळयांना. आणि फॉलोसुध्दा केली जाते आहे. हो सोबतच आयुष काढा घेणे, गरम पाणी पिणे, बाहेरून आल्यावर आंघोळ करणे वगैरे राहिलंच....
हं... तर मी सांगत होते की आम्हीही हे सगळं फॉलो करतो. आठवड्यातून एकदाच भाज्या, किराणा, आवश्यक वस्तू आणि खाऊ आणतो. म्हणजेच​ सारखं सारखं घराबाहेर जाणं टाळतो. आणलेलं सामान अंगणातच काही वेळ ठेवून, sanitize करून मगच घरात घेतो. 
आजही तसंच केलं. सकाळी आणलेल्या सामानापैकी भाज्या दुपारीच​ घरात घेतल्या. बाकीचा खाऊ मात्र अंगणातच खुर्चीवर राहू दिला. स्वतंत्र अंगण असल्याने मी माझ्या मनाप्रमाणे एखाद्या वस्तूवरील त्या विषाणूच्या प्रभावाचा काळ ठरवून ती वस्तू घरात घेते. (थोडक्यात आवरसावर करण्यातला माझा उत्साह कळला असेलच.) 
तर आजही मी त्याच वेळापत्रकानुसार इतर वस्तू अंगणातच राहू दिल्या. 'संध्याकाळी घेऊ घरात' म्हणून दुसऱ्या कामाला लागले. तेवढ्यात खुडबुड ऐकू आली. म्हंटलं 'मांजर असेल' म्हणून दार उघडून 'शूकss शूकss' केलं. पण बघते तर काय? कम्पांऊंड वॉलवर दोन माकडं निवांत बसली होती आणि त्यापैकी एकजण बिस्कीटाचे पुडे उघडून खात होता. बाकीचा​ खाऊ खुर्चीवर तसाच होता. तरीही दुसऱ्या माकडाने त्या खाऊला हात लावला नाही.
 आता खुर्चीसकट तो खाऊ मिळवण्यासाठी माझी आणि मुलांची धडपड सुरू झाली. 
मला आधीच प्राण्यांची भिती! माझी भूतदया  म्हणजे "मी तुला त्रास देणार नाही, पण तू ही मला घाबरवू नकोस​ न प्लीजssss....." अशी.🥺
 पण माझी भाषा काही त्या 'माणसाच्या पूर्वजांना' कळली नसावी. सारखं मला दात विचकटून घाबरवत होतं. मी पटकन दार बंद करून स्वतःला आणि मुलांना सेफ ठेवलं. पण आमचा खाऊ बाहेरच होता न... आता काय करावं? तेवढं तरी बरं की बिस्किटे खाणारा बिस्कीटातच गुंग होता. आता फक्त  दुसऱ्या माकडाचं लक्ष डायव्हर्ट करायचं होतं. मग एक आयडिया सुचली. त्याच्यासाठी खिडकीतून रस्त्यावर दूर एक पोळी फेकली, त्याला  सांगितलं "जा बाबा खा ती पोळी". तो पोळी खायला रस्त्यावर गेला तेवढ्यात मी थरथरतच खुर्ची आत घेतली आणि मुलीला दार बंद करायला सांगितलं. हुर्रे.... दोन बिस्कीटाचे पुडे आणि पोळीच्या बदल्यात आमचा खाऊ आम्हाला परत मिळाला. आमच्या वाटाघाटी सफल झाल्या. 
 नंतर आम्ही खिडकीतून, ग्रीलच्या गेटमधून माकडांची गंमत बघत राहिलो. तो ही दात विचकटून प्रतिसाद देत राहिला. काय सांगायचं असेल त्याला कोण जाणे.
अर्ध्या तासाने ते दोघे निघून गेले. 
नंतर मात्र मला माझ्याच कृतीचं हसू आलं. मुलांसाठी आणलेला खाऊ मुलांना मिळायलाच हवा होता. पण त्या मुक्या प्राण्यांना मानवी वस्तीत येण्यासाठी सुध्दा पोटाची भूकच कारणीभूत असेल नाही का.... जंगलात त्यांना खायला मिळत नसेल का? पाऊस तर पडतोय, म्हणजे पाण्याच्या शोधातही नसतील आली ही माकडं...
मग का आली असतील? आमच्या घरापासून जवळच कृषी विद्यापीठाचा परिसर आहे. तिथे वन्य प्राणी ही आहेत.
लॉकडाऊनमुळे माणसं मॉर्निंग वॉकला विद्यापीठ परिसरात जाऊ शकत नाहीत. एरवी प्राण्यांना त्या परिसरात​ माणसाची सवय झाली होती. त्या माणसांच्या काळजीने तर आली नसतील ना?...


© श्वेता 

माझा छावा

  माझा मुलगा श्रीवर्धन रोज अभ्यासाची टाळाटाळ करत खेळायला जातो. आपलं तेच खरं करतो. त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कधी त्याच्या गोड दिसण्याचा तर कधी खोट्या अश्रूंचा वापर कसा नि केव्हा करायचा हे त्याला बरोब्बर कळतं.
     शेंडेफळ असल्याने राजे चौथीत गेलेत तरी अजून "बाळच" आहेत आमच्यासाठी!
    पण तो खूप शूर आणि दिलदार आहे. खेळताना कधी तो स्वतः खोटा खेळ करून जिंकत नाही (प्रतिस्पर्धी वयाने कितीही मोठा असला तरी), लागलं खरचटलं तरी कधी रडत घरी येत नाही. स्वतः नवनवीन खेळांचे नियम शिकून खेळतो आणि मित्रांनाही ते शिकवतो. त्याच्या वागण्यात तडजोड करणं, "चलता है" म्हणून​ महत्वाच्या गोष्टी सोडून देणं नाही.
     काल आमच्या घरात गेला आठवडाभर उच्छाद मांडणा-या उंदराचा आम्हीच केलेल्या उपायांनी खात्मा झाला. संध्याकाळी स्वयंपाकघरात दुर्गंधी येताच मी दुसऱ्या खोलीत थांबून ह्यांच्यामागे  "त्याला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा" म्हणून तगादा लावला. ते ही नुकतेच बाहेरगावाहून आले होते. त्यांनी मुलांना एक offer दिली. 'जर तुम्ही दोघांनी मिळून तो मेलेला उंदीर बाहेर फेकला तर तुम्हाला शंभर रुपये देईन.' मुलगी समृध्दी दहावीला आहे. ती pocket money च्या आशेने 'हो' म्हणाली खरी पण ती ही माझीच मुलगी! मेलेल्या उंदराला पाहून, किळस येऊन ती भावाला म्हणाली, 'मी नाही करणार हे काम, पण पैसे अर्धे घेईन!'
   मला मुलाची काळजी! लहान आहे तो! ह्यांना म्हणलं तुम्हीच फेका त्याला. मुलांना तरीही pocket money द्या. पण श्रीवर्धनचं रडणं वेगळ्या गोष्टी साठी होतं. "अगं आई मी फेकला असता नं उंदीर. तेवढीच माझी भिती गेली असती आणि अनुभव पण आला असता" (ह्यातला एकूण एक शब्द त्याचा आहे, जसाच्या तसा)
   ह्यांनी उंदीर फेकून श्रीवर्धनला त्याच्या ह्या विचारासाठी म्हणून १००/- दिले. पण हे घराबाहेर जाताच त्याने ते मला परत केले आणि म्हणाला, "पुढच्या वेळी जेव्हा उंदीर मरेन, त्याला मीच बाहेर फेकणार. तेव्हा हे पैसे मला देशील!"
   त्याच्या ह्या बाणेदार उत्तराने मी चकीतच झाले. काही गोष्टी ह्या माणसाच्या स्वभावात उपजतच असतात. त्यासाठी वेगळे संस्कार करावे लागत नाहीत.

  - "स्वाभिमानी, शूर मुलाची आई" श्वेता चिमोटे

त्या दोघी



काल ट्रेनमध्ये भेटलेल्या त्या दोघी! नावं जाणून घ्यावीशी वाटली नाही. त्यांचे स्वभाव मात्र दोन टोकांचं प्रतिनिधित्व करत होते. 
गाडी पुणे स्टेशनवर आली आणि प्रत्येकजण आपापल्या मुलाबाळांसह, सामानाची adjustment करून निश्चिंत होऊ पाहत होता. आधी सासू सासरे आणि नऊ/दहा  वर्षांच्या मुलासह डोक्यावरचा पदर फिक्स करून पस्तीस - चाळीशीची ती बसली. बसली ती बसलीच. वयस्कर सास-यांना सामान ठेवू लागण्यात मदत नाही की त्यांची जबाबदारी घेणं नाही. हिचीच जबाबदारी त्यांनी घेतलेली दिसत होती. म्हणलं जाऊ दे...तिचे वयस्कर सासरे ह्यांची व्यवस्था लावून दुसऱ्या बोगीत गेले.
  मग 'ती' आली. त्याच वयाची. पण पदर, लाजणे & तोंड दाबून बुक्क्यांचा मार category ला challenge करणारी. दुसऱ्या बहिणीच्या लहानग्या मुलांना आणि वयस्कर आईला सांभाळून जड सामानाची व्यवस्था करण्याच्या खटपटीत होती. त्या पदरवालीच्या शेजारी बसलेल्या छोट्या भाच्याला​ 'पाय वर घे' सांगूनही त्याने ऐकलं नाही, तर एक ठेवून दिली सरळ.... पदरवाली मात्र तशीच बसून. जरा पाय वर घेण्याचे कष्ट न घेता 'मेरे पैरको लग गया न आपका bag' असंच सांगत राहिली. शेवटी पैलवान चिडली. 'भाभी आपने देखा न मैने बच्चे को मारा पैर उपर लेने के लिए? आप उठो, साईडमे खडी रहो आप!" पदरवाली तर जसं काही रिझर्व्हेशनचा मिळालेला बर्थ हातचा जाईल अशी तिच्याकडे बघत उठली. मग  Madam नी सामान बर्थ खाली टाकलं नि पदर पुन्हा स्थानापन्न झाली. पण त्या आधी पैलवान ताईंनी भाभीची  चिडल्या बद्दल माफी मागितली.
   प्रसंग संपला. पण आजच्या युगातल्याच या दोन टोकांच्या स्त्रिया बघून मी विचारात पडले. उंच पुरी, दिसायला बरी अशी ती डोक्यावर पदर इतकी दबलेली आहे की स्वतःची आणि इतरांची सांगितल्या शिवाय मदत करत नाही. स्वतःचं डोकं चालवत नाही. परक्या व्यक्तींकडून अपमानित होते, घरी तर पदोपदी होत असेल. 
पैलवान ताई मात्र नारळासारखी होती. वरून रफ & टफ पण आतून हळवी. चुकीची माफी मागणारी, बहिणीच्या मुलांना, आईला सांभाळणारी. आणि हो, मध्यरात्री गाडीत रडून आकांत करणा-या बाळाला gripe water देऊन शांत करणारी. 
'पदरवालीला' फक्तच 'पदर' होता, पण पैलवान ताईच्या व्यक्तिमत्वाला 'पैलू' होते. ह्यात चांगलं - वाईट, चूक - बरोबर माहीत नाही.
 एका बाजूला आजच्या युगातही दबून राहणारी, त्यात वावगं वाटून न घेणारी एक स्त्री आहे​. तर दुसरीकडे भांडून स्वतःच अस्तित्व सिद्ध करणारी  दुसरी स्त्री आहे.  
ज्या वातावरणात त्या वाढल्या असतील त्याचा परिणाम तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला आहेच. पण जे आहे ते तसंच चालू ठेवायचं की बदलायचं? आपण आपला ठसा उमटवलाच पाहिजे की स्वत:चं अस्तित्व गौण करून घ्यायचं? तुम्हाला काय वाटतं?

© श्वेता

घुसमट

अगं ए, इकडे कुठे?
कशी आहेस? कित्ती दिवसांनी भेटतोय..
हो ना... खूप छान वाटलं..
तुला कळलं का गं तिच्याबद्दल?
कोण गं?
अगं ती....फर्स्ट बेंचवर बसायची..
कविता लिहायची... गोड गायची...
हं..हं.. ती होय! वक्तृत्व स्पर्धेत नेहमीच बक्षीस मिळवायची..
हो ना.. आणि वादविवाद स्पर्धेत सुध्दा..
आठवली गं... तिचं काय? इथेच असते का? काय करते? लेखिका वगैरे झाली असेल नाही मोठी?
व्हायचं होतं गं तिलाही असंच मोठं कुणीतरी....नाव काढेल शाळेचं! आपल्या बाई म्हणायच्या...
झाली का मोठी? नशीबवान आहे बाई!
तिच्या आवडत्या शाईच्या पेनाने किती सुंदर लिखाण करायची.. सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हिचं यश हमखास...
नवराही म्हणायचा तिला, तुझ्या कवितेवर फिदा होऊन मागणी घातली म्हणून...मग लग्न, हनीमूनच्या पाठोपाठ 'संसार सुखाचा' सुरू झाला...
हे एवढंच काम झालं ना की मनातलं सग्गळं लिहीन मी आज.....
मग तेवढे सणवार, पाहुणे रावळे झाले की मिळेल उसंत लिहायला..काय घाई आहे?
आज मुलांना शाळेत सोडलं, आईंच्या सर्व तपासण्या करून झाल्या की थोडा वेळ उरेल हाताशी...लिहीता येईल न तेव्हा..
आज संध्याकाळी ह्यांचे साहेब यायचेत जेवायला..ते तेवढं आटपून मग....
अगं,आत्ता मुलांच्या परीक्षा तोंडावर आहेत, आधी त्यांचा अभ्यास घे, तुझं काय काढलंस मध्येच हे?...
आई,काय होतंय तुम्हाला? थांबा ह्यांना फोन करते...आई......
सगळं असं सुरू होतं... सावरलं तिनेच घराला.. आता स्वातंत्र्य आणि पूर्ण जबाबदारी तिचीच.. म्हणायला नवरा समजुतदार होता तसा..मग ती ही 'तशीच' समजुतदारपणे वागली..वाढती मुलं, वाढत्या जबाबदार्या, वाढतं वय.. पुन्हा सग्गळं सांभाळून लिहायला लागली...वाण सामानाची यादी, मुलांच्या शाळा, क्लासेसच वेळापत्रक,नवर्याच्या दौर्यांचं, तिच्या office चं आणि सणवारांचं गणित जुळवायला लागली...मग अशीच एकदा नीट यादी लिहून, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून पाठ टेकली जरा.. निवांतपणे....
तिच्यातल्या घुसमटीसकटच मग नेलं तिला....
कवटी फुटल्यावर तरी तिची घुसमट बाहेर पडली की नाही,देव जाणे!
© श्वेता

मी संसार माझा रेखिते

  "दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेऽऽखिते..."   सुखी संसार मांडण्याची, तो नीटनेटका, आखीवरेखीव करण्याची स्वप्नं थोड्याफार फ...