"झालं का तुझं सगळं आवरून? निघू आता", बबन सारखा आतबाहेर करत सुनंदाला घाई करू लागला. कालच रामूभैया आणि छोटूशी बबनचं बोलणं झालं होतं.
"ये बीमारी बहोत खतरनाक है. अब कंपनीमें फिर कब काम शुरू होगा क्या पता?" रामूभैया बोलत होता. तो वाट्टेल ते करून युपीला परत जाण्याबद्दल आग्रही होता. छत्तीसगडचा छोटू ही आपलं किडूकमिडूक आवरून पायी गावाकडे जायची तयारी करून होता. कारण रेल्वे आणि बसेस सगळंच लॉकडाऊनमुळे बंद होतं. सरकार सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा आग्रह धरत होती. लोकांना जमावबंदी करण्यात आली होती. विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी प्रसाद द्यायला सुरुवात केली होती. नव्याने आलेल्या या कोरोना नावाच्या विषाणूशी कसा सामना करावा हे कुणालाच कळत नव्हतं. त्यावर काही औषधोपचारही उपलब्ध नव्हते. लहानशा जागेत दाटीवाटीने राहणा-या गरीबांना सोशल डिस्टंसिंग समजत नव्हतं. तसं ते शिकलेल्या लोकांना तरी कुठे पुरतं कळलं होतं म्हणा! काही महाभाग पत्ते आणि क्यारमचे डाव मांडून लॉकडाऊन साजरा करत होते. या पंधरा दिवसांत आयुष्य एकदम बदलून गेलं होतं.
अचानक सुनंदाच्या आवाजाने बबनची तंद्री भंगली. "अवो पन आकाशची खेळणी अन् अभ्यासाची पुस्तकं बांधायची बाकी हायेत अजून." तिला पायी जायचं असलं तरी काडीकाडीने जमवलेल्या संसाराचा, वस्तूंचा मोह सुटत नव्हता. काय काय घेऊ असं तिला झालं. तिचा जीव हौसेने घेतलेल्या त्या प्रत्येक वस्तूत अडकला होता. सुनंदाने बांधलेल्या तीन चार गाठोड्यांकडे बघत बबन रागावला,"तू तर समदं आसं बांधू रायली जसं तुझ्या बानं टरकंच धाडलाय! ठून दे ते खेळणे अन् बुकं....जित्ते
-हाऊ तर खेळेन अन् शिकेन नं पोरगं ?!" हे ऐकून सुनंदाच्या डोळ्यांना धारा लागल्या. यांत्रिकपणे ती कपडे, भांडी आणि शिधा बांधू लागली. जास्तीचं सामान वस्तीत राहणा-या मुलांमध्ये वाटून दिलं. तिने आकाशला थोडंफार खाऊ घातलं आणि चटणी भाकरी एका कापडात बांधली. आता जे इतरांचं होईल तेच आपलंही, अशी मनाची समजूत घालत तिने घराला शेवटचा नमस्कार केला. बबननेही जड मनाने दोन खांद्यावर दोन गाठोडी घेतली आणि तिसरं गाठोडं डोक्यावर ठेवत शेजारच्या संज्याचा निरोप घेतला. कदाचित शेवटचा.......
दहा वर्षांपूर्वी बबन विदर्भातील एका खेड्यातून पुण्यात कामाच्या शोधात आला होता. एका नामांकित कंपनीत लेबर म्हणून काम करू लागला. लवकरच घरच्यांनी पोरगं कमावतं झालं तसं दोनाचे चार हात करून दिले. पुढे त्याला सुपरवायझर म्हणून प्रमोशनही मिळाले. वर्षभरात बबन्याचा बबनराव झाला. काही महिन्यांनी घरातही त्याला बाप म्हणून बढती मिळाली. कंपनीतून आल्यावर छोट्या आकाशशी खेळण्यात तो रंगू लागला. बबन आणि सुनंदाचा सुखाचा संसार सुरू झाला.
शेजारी युपी, बिहार आणि छत्तीसगड मधून आलेल्या मजदूरांची घरं होती. ते सर्व लोकही रोजगाराच्या शोधात पुण्यात येऊन दाखल झाले होते.
पुणे आणि परिसरात निर्माण झालेल्या ऊद्योगधंद्यांमुळे देशभरातील अनेक सुशिक्षित तरूणांना जशा करीयरच्या संधी निर्माण झाल्या. तसाच अल्पशिक्षितांनाही रोजगार मिळाला होता. सगळं कसं सुखासुखी चाललं होतं.
बबनचा मुलगा आकाश सुध्दा पालिकेच्या शाळेत जाऊ लागला. सुनंदाही घर सांभाळून शिवणकाम करत संसाराला हातभार लावत होती. इतरांचे संसारही थोड्याफार फरकाने बबन आणि सुनंदा प्रमाणेच बहरत होते.
बबनचे आईवडील खूप धार्मिक होते. शेगावच्या गजानन महाराजांवर त्यांची दृढ श्रध्दा होती. ते गावाकडे राहून शेती करत होते.
फेब्रुवारी - मार्च महिन्यात परदेशातून येणाऱ्या
कोविड १९ च्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना श्वसनास त्रास होणे, खोकला, ताप, थकवा अशी लक्षणे दिसू लागली. हा संसर्गजन्य आजार असल्याने आठ पंधरा दिवसांतच ह्या आजाराने कितीतरी लोकांना घेरले. रोगाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला. रुग्णसंख्या वाढल्याने सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. तसा लॉकडाऊन जगभरात आधीच सुरू झाला होता. लोकांना फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीच घराबाहेर निघायची परवानगी होती. कदाचित अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल, या भितीने ज्यांना परवडत होतं त्यांनी घरात अन्नधान्य आणि इतर किराणा मालाचा वारेमाप साठा करून ठेवला. गरीबांसाठी स्वस्त धान्य दुकानांतून प्रशासन सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरीत करत होते. मात्र प्रचंड लोकसंख्येच्या तुलनेत ते कमी पडत होतं.
काम बंद झाल्याने सुरुवातीला फक्त काही दिवसांचा वाटणारा हा प्रश्न इतका व्यापक असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. मात्र हळूहळू दळणवळणाची साधने ठप्प झाली. रेल्वे आणि बसेस सुरू असताना परगावातून आलेले लोक गावी परतू लागले. पण तिथेही मरणाची गर्दी! बबन ती गर्दी पाहून बायको पोराला घेऊन ह्या गर्दीत आपली ताटातूट होईल, ह्या भितीने रोज रेल्वे स्टेशनहून निराश होऊन परतायचा. त्याला वाटलं, काही दिवसांत ही गर्दी ओसरली की जाऊ गावाकडे पण........ अचानक सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व रेल्वेगाड्या आणि बसेस बंद करण्याचे आदेश दिले. आता जिल्ह्याची सीमा ओलांडायला पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार होती. या काळात डॉक्टरांच्या सोबतीला पोलिस प्रशासन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचं काम वाढलं होतं.
प्रायव्हेट गाडी करून जाण्याएवढी बबनची आर्थिकस्थिती चांगली नव्हती. गावी शेतीसाठी पैसा पुरवताना त्याच्या हाती विशेष अशी शिल्लक उरत नव्हती. म्हणूनच रामूभैया आणि छोटू सारखाच तोही पायी चालत गाव गाठण्यासाठी निघाला. त्याच्या मागेपुढे
चालणा-यांची खूप मोठी रांग होती. ती पाहून त्याला पंढरीला जाणा-या
वारक-यांची आठवण आली. फरक एवढाच होता की वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीत जातात, तर इथे हे सगळे जीव वाचवण्यासाठी निघाले होते!
संध्याकाळपर्यंत पावलं ओढत बबन नगरला पोहचला. त्याच्या सोबत विदर्भातील बरेच लोक असल्याने त्याला हायसं वाटलं. जसजसा अंधार पडू लागला तसे लोक रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतांमध्ये विसावू लागले. जवळपासच्या विहीरीतून पाणी काढून तीन दगडांची चूल मांडली. स्त्रियांनी स्वयंपाक केला. दुसऱ्या दिवशी पहाटेच सगळे पुन्हा गावची वाट चालू लागले.
चालत चालत औरंगाबादमध्ये दाखल झाले.
एव्हाना टिव्हीवर ह्या पायी प्रवाशांच्या बातम्या झळकू लागल्या. त्यांचा रणरणत्या उन्हात कुटुंबासह मैलोनमैल केलेला प्रवास अनेकांच्या मनात करुणा निर्माण करत होता. काही स्वयंसेवी संस्था आणि गावकरी ह्या लोकांना जेवण पुरवत होते. कोणी त्यांच्या झिललेल्या टाचांना थोडा दिलासा मिळावा म्हणून चपला देत होते.
कुठे खाण्यापिण्याची सोय होत होती तर कुठे या अनोळखी लोकांना चोर समजून हुसकावून लावले जात होते. तर कुठे ह्या पाठीवर बि-हाड घेऊन निघालेल्या लोकांचच सामान पळवलं जात होतं. देशभरातील मजदूरांची हीच कहाणी होती.
बबन आणि इतर लोक जिथे मोबाईलला रेंज मिळेल तिथून परराज्यातल्या आपल्या मित्रांची चौकशी करत होते. त्यांना तर किती दिवस चालावं लागणार होतं, देव जाणे! पण प्रत्येक जण हिमतीने पुढचं पाऊल टाकत होता.
आपत्तीत माणसाच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू दिसून येत होते.
मजल दर मजल करत पाच सहा दिवसांची पायपीट करत बबन अन् त्याचे साथीदार विदर्भाच्या सीमेजवळ पोहोचले. चिखलीच्या पुढे माळरानावर विसावा घ्यायला मंडळी थांबली. बबन आणि सुनंदा आकाशला मध्ये घेऊन झोपी गेले. तेवढ्यात "चोरsss चोरsss पकडाsss पकडाss" असा आवाज आला. लॉकडाऊनमध्ये मध्यमवर्गीय माणूस घरात कोंडला गेला असला तरीही हातावर पोट असलेल्या गरीबांना दोन वेळच्या अन्नासाठी हातपाय चालवावे लागत होते. त्यातूनच चोरी, लुटालूट यासारख्या घटना घडू लागल्या.
आताही अशाच चोराच्या शोधात गावकरी या माळरानावर आले. बबन आणि त्याचं कुटुंब इतर साथीदारांपासून थोडं दूर होतं. गावकऱ्यांनी बबनलाच चोर समजून मारहाण केली. सर्व लोक ह्या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरून गेले. सुनंदाने गावकऱ्यांच्या हातापाया पडून बबनची सुटका करवून घेतली.
दुसऱ्या दिवशी सकाळी बबनला साधं चालणंही कठीण झालं. आता सामानसुमान घेऊन चालणं शक्यच नव्हतं. बबनची अवस्था बघून सुनंदा रडू लागली. आकाशही काही न समजून रडू लागला.
तेवढ्यात तिला भाज्यांचा टेम्पो जाताना दिसला. तिने धावत जाऊन त्या टेम्पोला थांबवलं. तिची व्यथा त्या टेम्पोवाल्याला सांगितली. त्यानेही त्या तिघांना आपल्या गाडीतून त्यांच्या गावी पोहचवले.
बबन आणि सुनंदा पुण्याहून निघाल्यापासून गावी त्याचे आईवडील अधीरतेने त्यांची वाट बघत होते. टिव्हीवरच्या बातम्यांनी त्यांची काळजी गहिरी होत होती.
बबनला इतक्या हाल अपेष्टांमधून परत आलेलं बघून त्यांचे डोळे घळाघळा वाहू लागले.
बबनला तर हा चमत्कार वाटला. आपल्या देवभोळ्या आईवडीलांच्या पुण्याई मुळेच आज आपण जिवंत आहोत असं त्याला मनोमन वाटू लागलं. तो लहान मुलासारखा हमसून हमसून रडू लागला. आणि बाबांना म्हणाला, "बाबा, तुमी शेगावची पायी वारी करता. गजानन महाराज तुमाले वारीत संगं संगं चाल्तानी दिसतात न.... पन आज बाबा मी या जगण्याच्या वारीत त्यांना लय खेप भेटलो. ते वेगवेगळ्या रुपात मला मदत करत व्हते. या टेम्पोवाल्याच्या रुपात तुमच्या महाराजांनीच मला अन् तुमच्या सुनेला, नातवाला इथंवर आनलं बाबा!"
बबन, सुनंदा आणि त्याच्या आईवडीलांनीही साश्रू नयनांनी त्या टेम्पोवाल्याचे आणि देवाचे आभार मानले.
- श्वेता चिमोटे

No comments:
Post a Comment