तीन महिने....बरोब्बर तीन महिने झाले त्या राक्षसाला देशात शिरून! आता ह्या राक्षसाला हरवण्यासाठी वारंवार हात धुणे, मास्क लावणे, हात आणि वस्तू sanitize करणे, शारीरिक अंतर राखणे ही यादी एव्हाना पाठ झालीय सगळयांना. आणि फॉलोसुध्दा केली जाते आहे. हो सोबतच आयुष काढा घेणे, गरम पाणी पिणे, बाहेरून आल्यावर आंघोळ करणे वगैरे राहिलंच....
हं... तर मी सांगत होते की आम्हीही हे सगळं फॉलो करतो. आठवड्यातून एकदाच भाज्या, किराणा, आवश्यक वस्तू आणि खाऊ आणतो. म्हणजेच सारखं सारखं घराबाहेर जाणं टाळतो. आणलेलं सामान अंगणातच काही वेळ ठेवून, sanitize करून मगच घरात घेतो.
आजही तसंच केलं. सकाळी आणलेल्या सामानापैकी भाज्या दुपारीच घरात घेतल्या. बाकीचा खाऊ मात्र अंगणातच खुर्चीवर राहू दिला. स्वतंत्र अंगण असल्याने मी माझ्या मनाप्रमाणे एखाद्या वस्तूवरील त्या विषाणूच्या प्रभावाचा काळ ठरवून ती वस्तू घरात घेते. (थोडक्यात आवरसावर करण्यातला माझा उत्साह कळला असेलच.)
तर आजही मी त्याच वेळापत्रकानुसार इतर वस्तू अंगणातच राहू दिल्या. 'संध्याकाळी घेऊ घरात' म्हणून दुसऱ्या कामाला लागले. तेवढ्यात खुडबुड ऐकू आली. म्हंटलं 'मांजर असेल' म्हणून दार उघडून 'शूकss शूकss' केलं. पण बघते तर काय? कम्पांऊंड वॉलवर दोन माकडं निवांत बसली होती आणि त्यापैकी एकजण बिस्कीटाचे पुडे उघडून खात होता. बाकीचा खाऊ खुर्चीवर तसाच होता. तरीही दुसऱ्या माकडाने त्या खाऊला हात लावला नाही.
आता खुर्चीसकट तो खाऊ मिळवण्यासाठी माझी आणि मुलांची धडपड सुरू झाली.
मला आधीच प्राण्यांची भिती! माझी भूतदया म्हणजे "मी तुला त्रास देणार नाही, पण तू ही मला घाबरवू नकोस न प्लीजssss....." अशी.🥺
पण माझी भाषा काही त्या 'माणसाच्या पूर्वजांना' कळली नसावी. सारखं मला दात विचकटून घाबरवत होतं. मी पटकन दार बंद करून स्वतःला आणि मुलांना सेफ ठेवलं. पण आमचा खाऊ बाहेरच होता न... आता काय करावं? तेवढं तरी बरं की बिस्किटे खाणारा बिस्कीटातच गुंग होता. आता फक्त दुसऱ्या माकडाचं लक्ष डायव्हर्ट करायचं होतं. मग एक आयडिया सुचली. त्याच्यासाठी खिडकीतून रस्त्यावर दूर एक पोळी फेकली, त्याला सांगितलं "जा बाबा खा ती पोळी". तो पोळी खायला रस्त्यावर गेला तेवढ्यात मी थरथरतच खुर्ची आत घेतली आणि मुलीला दार बंद करायला सांगितलं. हुर्रे.... दोन बिस्कीटाचे पुडे आणि पोळीच्या बदल्यात आमचा खाऊ आम्हाला परत मिळाला. आमच्या वाटाघाटी सफल झाल्या.
नंतर आम्ही खिडकीतून, ग्रीलच्या गेटमधून माकडांची गंमत बघत राहिलो. तो ही दात विचकटून प्रतिसाद देत राहिला. काय सांगायचं असेल त्याला कोण जाणे.
अर्ध्या तासाने ते दोघे निघून गेले.
नंतर मात्र मला माझ्याच कृतीचं हसू आलं. मुलांसाठी आणलेला खाऊ मुलांना मिळायलाच हवा होता. पण त्या मुक्या प्राण्यांना मानवी वस्तीत येण्यासाठी सुध्दा पोटाची भूकच कारणीभूत असेल नाही का.... जंगलात त्यांना खायला मिळत नसेल का? पाऊस तर पडतोय, म्हणजे पाण्याच्या शोधातही नसतील आली ही माकडं...
मग का आली असतील? आमच्या घरापासून जवळच कृषी विद्यापीठाचा परिसर आहे. तिथे वन्य प्राणी ही आहेत.
लॉकडाऊनमुळे माणसं मॉर्निंग वॉकला विद्यापीठ परिसरात जाऊ शकत नाहीत. एरवी प्राण्यांना त्या परिसरात माणसाची सवय झाली होती. त्या माणसांच्या काळजीने तर आली नसतील ना?...
© श्वेता

No comments:
Post a Comment