माझा मुलगा श्रीवर्धन रोज अभ्यासाची टाळाटाळ करत खेळायला जातो. आपलं तेच खरं करतो. त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कधी त्याच्या गोड दिसण्याचा तर कधी खोट्या अश्रूंचा वापर कसा नि केव्हा करायचा हे त्याला बरोब्बर कळतं.
शेंडेफळ असल्याने राजे चौथीत गेलेत तरी अजून "बाळच" आहेत आमच्यासाठी!
पण तो खूप शूर आणि दिलदार आहे. खेळताना कधी तो स्वतः खोटा खेळ करून जिंकत नाही (प्रतिस्पर्धी वयाने कितीही मोठा असला तरी), लागलं खरचटलं तरी कधी रडत घरी येत नाही. स्वतः नवनवीन खेळांचे नियम शिकून खेळतो आणि मित्रांनाही ते शिकवतो. त्याच्या वागण्यात तडजोड करणं, "चलता है" म्हणून महत्वाच्या गोष्टी सोडून देणं नाही.
काल आमच्या घरात गेला आठवडाभर उच्छाद मांडणा-या उंदराचा आम्हीच केलेल्या उपायांनी खात्मा झाला. संध्याकाळी स्वयंपाकघरात दुर्गंधी येताच मी दुसऱ्या खोलीत थांबून ह्यांच्यामागे "त्याला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा" म्हणून तगादा लावला. ते ही नुकतेच बाहेरगावाहून आले होते. त्यांनी मुलांना एक offer दिली. 'जर तुम्ही दोघांनी मिळून तो मेलेला उंदीर बाहेर फेकला तर तुम्हाला शंभर रुपये देईन.' मुलगी समृध्दी दहावीला आहे. ती pocket money च्या आशेने 'हो' म्हणाली खरी पण ती ही माझीच मुलगी! मेलेल्या उंदराला पाहून, किळस येऊन ती भावाला म्हणाली, 'मी नाही करणार हे काम, पण पैसे अर्धे घेईन!'
मला मुलाची काळजी! लहान आहे तो! ह्यांना म्हणलं तुम्हीच फेका त्याला. मुलांना तरीही pocket money द्या. पण श्रीवर्धनचं रडणं वेगळ्या गोष्टी साठी होतं. "अगं आई मी फेकला असता नं उंदीर. तेवढीच माझी भिती गेली असती आणि अनुभव पण आला असता" (ह्यातला एकूण एक शब्द त्याचा आहे, जसाच्या तसा)
ह्यांनी उंदीर फेकून श्रीवर्धनला त्याच्या ह्या विचारासाठी म्हणून १००/- दिले. पण हे घराबाहेर जाताच त्याने ते मला परत केले आणि म्हणाला, "पुढच्या वेळी जेव्हा उंदीर मरेन, त्याला मीच बाहेर फेकणार. तेव्हा हे पैसे मला देशील!"
त्याच्या ह्या बाणेदार उत्तराने मी चकीतच झाले. काही गोष्टी ह्या माणसाच्या स्वभावात उपजतच असतात. त्यासाठी वेगळे संस्कार करावे लागत नाहीत.
- "स्वाभिमानी, शूर मुलाची आई" श्वेता चिमोटे

No comments:
Post a Comment