Saturday, April 24, 2021

मी संसार माझा रेखिते

 "दिसते मजला सुखचित्र नवे

मी संसार माझा रेऽऽखिते..."


  सुखी संसार मांडण्याची, तो नीटनेटका, आखीवरेखीव करण्याची स्वप्नं थोड्याफार फरकाने प्रत्येकीलाच पडत असतात. मग ती गृहिणी असो वा करीअरीस्ट!
  सहसा स्त्रीमन हे घराभोवतीच रूंजी घालतं. हाताखाली कामाला कितीही मदतनीस असले तरीही घराची संपूर्ण जबाबदारी आजही स्त्रीचीच मानली जाते आणि अपवादानेसुध्दा ह्याला अपवाद सापडत नाहीत. आताशा बऱ्याच घरांतून नवरे 'मदत' करतात पण लीड रोलमध्ये स्त्रियाच असतात. असो.....
घराचा कोपरान् कोपरा स्वच्छ, नीटनेटका आणि सौंदर्यपूर्ण करण्यासाठीचे सर्व प्रयत्न 'ती' करत असते. घराला 'घरपण' देत असते‌.
   आपल्या आजी, आई, मावशी, काकू किंवा मामीच्या स्वयंपाकघरातील लिंबू/चिंच लावून लखलखणाऱ्या पितळी डब्यांच्या सुबक मांडणीपासून ते आत्ताच्या मॉड्यूलर किचनपर्यंत सगळं घर 'ती'चा हात लागूनच सजलेलं असतं.
स्त्री; मग ती गरीब असो वा श्रीमंत, सुशिक्षित असो वा अशिक्षित, आपल्या गृहकृत्यदक्षतेला अनुसरून ती घर सजवत राहते. मध्यंतरी घराशेजारच्या एका कन्स्ट्रक्शन साईटवर वॉचमनच्या झोपडीत त्या बाईंनी फळीवर रांगेत मांडलेले चकचकीत स्टीलचे डबे सारखं लक्ष वेधून घ्यायचे. ते 'ती'चं 'घर' होतं. नीटनेटकं सजवलेलं.
आमची आजी बऱ्याच म्हणी म्हणायची. "असल्याचा करते संसार...नसल्याचा करते विचार!" अशा 'असल्या', 'नसल्या' वस्तू मांडून, काडी काडी वेचून कित्येक जणींनी संसार केलेत, करत आहेत अन् कदाचित या पुढेही असेच करत राहतील.
एकदा सोशल मिडियाच्या एका ग्रुपवर एका सखीने विचारलं की, "तुम्ही कपड्यांचं कपाट कसं आवरता?" आता कित्येकांना वाटेल, "हा काय प्रश्न झाला?" मात्र त्या प्रश्नाला बरीच सकारात्मक उत्तरं आली. ती सर्व उत्तरं वाचताना पुन्हा एकदा त्या मेरी कॉन्डो बाई आणि त्यांची घर आवरण्याची विशिष्ट पध्दत समोर आली.
  बरं त्यांचे व्हिडीओज् बघून आपल्याला आपलं घर म्हणजे पसाऱ्याचं माहेरघरच वाटू लागतं. आणि त्यांच्या विदेशी कपडेपटापुढे आपल्या साड्या, सलवार सुटस्, जिन्स आणि कुर्तीज् एन् ऑल असा भरगच्च कार्यक्रम कसा आवरावा असं वाटून मी "होम ऑर्गनायझेशन"चे 'देसी पर्याय' शोधू लागले. त्यात भारताच्या कानाकोपऱ्यातील विविध होममेकर्सचे चॅनल्स समोर आले. भारताच्या मेट्रो सिटीज् पासून खेडोपाडी राहणाऱ्या आणि प्रशस्त बंगल्यांपासून ते चाळीतल्या टीचभर जागेत संसार थाटणाऱ्या कित्येक सख्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून "होम मेकींग/होम किपिंग" ला ग्लॅमर मिळवून देताहेत हे कळलं.

"घर आणि 'बरंच काही'... "

आपल्या प्रेक्षकांपुढे घर आवरण्यातील, सजवण्यातील बारकाव्यांसह काही जणी टाकाऊतून टिकाऊ ऑर्गनायझर्सची निर्मिती करत पसारा मॅनेज करतात तर कधी त्यासाठी ऑनलाईन उपलब्ध असलेल्या प्रॉडक्टची माहिती पुरवतात.
घर सजवताना वस्तूंची खरेदी करायला एखाद्या स्थानिक बाजारात प्रेक्षकांसह भटकंती करतात. कधी घराचा एखादा कोपरा हिरवागार करण्यासाठी वेगवेगळ्या आकारातील तयार/स्वनिर्मित कुंड्यांच्या मदतीने तो कोपरा अधिकच सुशोभित करतात. हे सगळं 'टिपिकल महिला पुरवण्यांचं डिजिटल व्हर्जन' वाटत असलं तरी काही कंटेट मेकर्स मात्र आपलं चॅनल खूप प्रोफेशनली चालवतात. घर आणि त्यासंबंधी माहिती देतानाच त्या
स्त्रियांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्या विषयीदेखील महत्वपुर्ण माहिती देतात.  तसेच गृहिणींमध्ये बरेचदा डोकावणारा न्यूनगंड आपल्या प्रेरक विचारांनी दूर करतात.
  प्रत्येक घराचं राहणीमान, दिनचर्या ही वेगवेगळी असते. तरीही वेळेचे व्यवस्थापन हे प्रत्येक गृहिणी अथवा नोकरदार स्त्रीला उपयोगाचं ठरतं. यात मील प्लानिंग, घरकामांचं वेळापत्रक आणि सणावारांची पूर्वतयारी असे बरेचसे विषय आपापल्या पध्दतीने हाताळतात.
पूर्वी घरातील ज्येष्ठ स्त्रिया अधूनमधून राहिलेल्या कामांची आठवण करून देत असत. मात्र कालपरत्वे आणि काही ठिकाणी वैयक्तीक कारणांमुळे घरात ज्येष्ठांचा वावर कमी झालाय. अशावेळी या गृहकृत्यदक्ष सख्यांचे व्हिडीओज्  बघून त्यातून प्रेरणा मिळते. शेवटी आपण एकमेकांचे संसार बघूनच आपला संसार कसा करायचा हे ठरवत असतो.
  हे सतत "नीट & क्लीन" व्हिडीओज् बघून 'ह्यांची घरं किती नीटनेटकी असतात. आपल्याला मात्र हे जमत नाही' असं वाटतं. मात्र त्यापैकी काही जणी याचं खरं उत्तर देतात. घर सतत चकचकीत ठेवणं नेहमीच शक्य नसतं. कारण घर ही चोवीस तास चालणारी इंडस्ट्री आहे. प्रत्येकीला कामासोबतच घरातील सदस्यांना वेळ द्यायचा असतो आणि आपले छंदही जोपासायचे असतात.
  खरंतर या यूट्यूबर्स पैकी काही जणी आधी नोकरी/व्यवसाय करणाऱ्या आहेत. तर काही ठरवून गृहिणीपद भूषवतायत. घरकामाला अजूनही 'काम' मानलं जात नाही. त्यातून अर्थार्जन होत नसल्याने त्याला दुय्यमच मानतात. आणि घरी राहणाऱ्या स्त्रियांची 'ती घरीच असते/ती काहीच करत नाही' अशी ओळख करून दिली जाते. बरेचदा गृहिणी स्वतःच तसं म्हणतात. मात्र यूट्यूबवरील स्त्रियांच्या ह्या व्हिडीओज् मधून त्या एक गोष्ट अधोरेखित करतात, " 'Do' the work which you 'Love' Or 'Love' the work which you 'Do' "
एक 'होममेकरच' घराचं 'घरपण' टिकवून ठेवते.
   सोप्पं नसतंय ते.....!

मी संसार माझा रेखिते

  "दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेऽऽखिते..."   सुखी संसार मांडण्याची, तो नीटनेटका, आखीवरेखीव करण्याची स्वप्नं थोड्याफार फ...