इंनटरनॅशनल शेफज् डे
(२० ऑक्टोबर) च्या निमित्ताने...
आज नवऱ्याला पुन्हा एकदा स्वयंपाक करण्याची खुमखुमी आली. तशी ती आठवड्यातून एक दोनदा येतेच म्हणा!
"हिला बरा आराम मिळतो बाई स्वयंपाकातून!", असा सुप्त विचार तुमच्या मनात आला असेलच. पण एखाद्या मोठ्या शेफला कधी बघितलंय का स्वयंपाकपूर्व तयारी करताना किंवा नंतरचा ओट्यावरचा पसारा आवरताना? नाही ना! त्यांचे बॅक किचन सांभाळायला जसे इतर माणसं असतात तसेच माझ्या नवऱ्याच्या हाताखाली राबायला घरात उपस्थित सर्व मंडळी कमीच पडतात.
पण ह्यातला गमतीचा भाग सोडल्यास माझा नवरा खरच 'सुगरण' आहे! मुळात स्वयंपाक करणे (जेवण बनवणे नाही हं!) हे युगानुयुगे स्त्रीचंच काम असल्याचं मानल्या गेल्याने रूचकर स्वयंपाक करणाऱ्या पुरूषाला काय विशेषण द्यावं? हा प्रश्नच पडतो.
नाही म्हणायला अज्ञातवासात, विराट राजाच्या दरबारी असताना गदाधारी परमवीर भीमाने बल्लवाचार्य बनून आपलं पाककौशल्यही दाखवलंच. पण तरीही स्वयंपाक करू शकणाऱ्या पुरूषाला "आचारी" म्हणून हिणवण्याचा प्रयत्नच काहीजण करतात. असो...
'शेफ'च्या करीयरला भारतातील कित्येक नामवंत शेफ्सनी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. आता तर "अभीज् किचन" हे स्त्रियांच आवडतं झालं आहे.
स्वयंपाक ही एक कला आहे आणि स्वयंपाक करणारी व्यक्ती ही एक कलाकार! (culinary artist)
ह्या लॉकडाऊनच्या काळात तर कित्येक तरूण स्वयंपाक करायला शिकले. ज्यांना स्वयंपाक करता येत नव्हता त्यांना आपल्या 'नाकर्तेपणाची' जाणीव झाली. मुलगी असो किंवा मुलगा, प्रत्येकाला किमान स्वतःसाठी तरी स्वयंपाक करता यायलाच हवा. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत ते उपाशी राहणार नाही.
माझ्या माहेरी याबाबतीत स्त्री - पुरूष समानता होती, आहे! माझे पप्पा त्यांच्या लहानपणी माझ्या आजीला आणि नंतर आमच्या लहानपणी माझ्या आईला सणावारी स्वयंपाकात मदत करायचे. एरवीही कधी वेळ मिळेल तेव्हा एखादा पदार्थ ते करत असत. तो ही चविष्ट! हे सर्व लहानपणापासून पाहिल्यामुळे हे काम बाईचं, ते काम पुरूषाचं असले 'संस्कार' काही आमच्यावर झाले नाही. माझा भाऊसुध्दा भावजयीला स्वयंपाकात मदत करतो. मला चहा करायला सुध्दा आईने नाही तर पप्पांनी शिकवले.
आता तर इंटरनेटवर एखादी रेसिपी शोधताना कित्येक पुरूष शेफ्सचे व्हिडीओज् डोळ्यांसमोर येतात. मुळात 'शेफ' म्हणल्यावर छान छान पदार्थ करणारे पुरूष असंच चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं.
२० ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शेफज् डे म्हणून साजरा केला जातो. आपल्या पाककलेने सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या आणि आपली खाद्यसंस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहचवणार्या समस्त स्त्री आणि पुरूष शेफ्सना आजच्या या शेफज् डेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
श्वेता पांडे - चिमोटे

No comments:
Post a Comment