'पुनश्च हरीओम' झालं असलं तरी आयुष्य काही 'न्यू नॉर्मल' झालं नाहीय. ऑनलाईन शाळेची कल्पनाही आता तेवढीशी एक्सायटींग राहिलेली नाही. या रूटीनमधून थोडा बदल म्हणून व्याघ्रदर्शनाचा कार्यक्रम ठरवला.
तसा तर वाघोबाला कितीदा तरी पाहिलंय, कधी झू मध्ये, कधी टीव्हीवर. थायलंडला तर 'जंगल सफारी' मध्ये एकाच वेळी, एकाच ठिकाणी डझनाने वाघ बघितले. पण या जंगलाच्या राजाला असं पिंजऱ्यात पाहण्यात काही मजा नाही. तिथे तो राजा न राहता एखाद्या पाळीव प्राण्यासारखा आश्रित वाटतो. त्याचं खरं राजबिंडं रूप बघायचं असेल तर त्याच्या घरी, म्हणजे जंगलात जाऊन, त्याच्या मर्जीने त्याचं दर्शन घेण्यात खरी मजा आहे.
जंगलात गेल्यावर मुख्य आकर्षण जरी वाघ असला तरी "कधी दिसेल वाघ?", "इथे नक्की दिसेल न?" , "किती वेळ लागेल?" असले प्रश्न विचारून आपल्या गाईडला भंडावून सोडू नये. वाघ दिसेपर्यंत जंगल भ्रमंतीचा आनंद घ्यावा. निसर्गाचं सौंदर्य बघावं. विविध प्राणी, पक्षी आणि मनुष्य यांच सहजीवन समजून घ्यायचा प्रयत्न करावा. एखादं घाईचं काम असल्यासारखं "गाडीत बसले, जंगलात गेले, वाघ बघितला अन् निघाले" असं करू नये. आपल्या सोबतचे गाईड हे बरेचदा स्थानिक रहिवासी/आदिवासी असतात. ते या निसर्गाच्या सगळ्यात जवळचे असतात. त्यांचे अनुभव देखील अद्भूत असतात. व्याघ्रदर्शनाला आलेल्या पर्यटकांना वाघ दाखवता यावा, आपल्या जंगलात पर्यटक वारंवार यावे, यासाठी ते ही प्रयत्न करत असतात.
आणि एवढं सगळं करूनही जर नाहीच दिसला वाघ तर कुठे बिघडलं? आपण जंगलात त्याला "बघायला" आलोय, हे त्याला थोडीच माहीत असतं. तो राजा आहे जंगलाचा! त्याला वाटलं तर दर्शन देईल, नाही वाटलं तर नाही देणार, त्याची मर्जी!
पण आम्हाला मात्र पहिल्याच दिवशी राजा भेटला. थोडाच वेळ... अगदी 'नाहीच आपल्या नशीबात वाघाचं दर्शन' असं वाटत असतानाच अचानक झाडीत वाघ असल्याचं समोरच्या जिप्सीतील पर्यटकांनी इशाऱ्यांनी सांगितलं आणि आमची पहिली धावती भेट झाली. थोडाच वेळ का होईना, पण आपण वाघ बघितला, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट होती.
आता वेध लागले होते ते दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या सफारीचे! दुसऱ्या दिवशी मदनापूर गेटमधून आमची जिप्सी आत शिरली. आदल्या दिवशी ज्या ठिकाणी साईटींग झालं होतं, म्हणजे वाघ दिसला होता, त्या ठिकाणी एक चक्कर मारून आलो. एका पाणवठ्यावर काही जिप्सीज् रांगेने उभ्या होत्या. आम्हाला सगळ्यांनी शांत राहण्याची खूण केली. काय चाललंय, म्हणून समोर बघितलं तर आमच्या गाडीसमोर काही फुटांवरच वाघ शांत बसला होता. त्याने आमच्याकडे तोंड वर करून बघितलं आणि मस्त बसून राहिला. तोच आमचं लक्ष पाणवठ्याच्या बाजूच्या अन् समोरच्या काठांकडे गेलं. तिथे अजून दोन वाघ निवांत बसले होते. आमच्या दृष्टीने मोठे असलेले ते तिघं वाघाचे दीड वर्षांचे बच्चे होते. त्यांनी शांतपणे आम्हाला दर्शन दिलं. खरंतर ते इतक्या छान पोझ देत होते की आपण कॅमेरा आणायला हवा होता, याचं राहून राहून वाईट वाटत होतं. मोबाईल कॅमेरावर इथे बंदी असल्याने आणि गाईड दादांनी आमचे मोबाईल्स आधीच जप्त केल्याने आम्ही फक्त वाघोबांकडे टुकुटुकु बघत बसलो. इतर सर्व जिप्सींमधील हौसे नवसे फोटोग्राफर्स आपले हायटेक कॅमेरे सरसावून एकच क्लिकक्लिकाट करत होते. आता आम्हाला त्यांचा अजूनच हेवा वाटू लागला. आमच्या शेजारच्या जिप्सीतील वाईल्ड लाईफ फोटोग्राफर अन् गाईड यांच्यात चांगली घसेट असावी अशाप्रकारे तो गाईड फोटोग्राफरला म्हणाला, "अरे नुसते फोटोच काढतो का? अन् डोळे काय पार्सल म्हणून घरी नेतो?" हे ऐकून सगळे हसले. फोटोग्राफरला सुध्दा आपली चूक लक्षात आली. आम्ही कॅमेरा न आणण्याचं दु:ख कमी झालं. ज्याला "याचि देही, याचि डोळा" बघण्यासाठी इतका आटापिटा केला त्याला कॅमेऱ्यात काय फक्त इतरांना दाखवण्यासाठी कैद करायचं? त्या वाघाचं, जंगलाच्या राजाचं रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठीच तर आपण इतक्या लांब आलोय. वाघाचे फोटो काय इंटरनेटवर असंख्य मिळतील. पण असा जिवंत, रूबाबदार, स्वत:च्या अधिवासात पर्यटकांना दिमाखात दर्शन देणारा वाघ नंतर केव्हा बघता येईल? या विचारांनी तर अजूनच बरं वाटलं. फोटोज् तर केवळ आठवण म्हणून काढले जातात. मेमरी कार्ड फुल होतंय असं वाटल्यावर डिलिटही केले जातात. पण अनुभव.... ते नाही डिलिट करता येत. आम्ही व्याघ्रदर्शनाचा अनुभव घेतला. अगदी मनमुराद!
मग वाघांना पाणवठ्यावर सोडून पुढे निघालो. वनविभागाच्या एका ठराविक स्पॉटवर सोबत आणलेला चहा नाश्ता केला आणि ड्रायव्हर जिथे नेईल तिथले वन्यजीवन बघू लागलो. रानगवा, नीलगाय, सांभर, हरीण, माकड, मोर, विविध पक्षी..... वाघाच्या दर्शनाने सुखावल्यामुळे आता हे सर्व प्राणी पक्षीसुध्दा बघण्यात मजा वाटू लागली.
पण आज जणू काही वाघोबाला आमची ही ट्रीप "यादगार" करायचीच होती. पुढच्या वळणावरच्या झाडीत पट्टेदार शेपटी हलवत बसलेला अजून एक वाघ अस्पष्टसा दिसला. मग डोळे ताणून ह्या झाडाखाली आहे की त्या झाडाखाली? अशी तीन चार जिप्सीवाल्यांनी कुजबुजत चौकशी केली. आमच्या डाव्या बाजूला पाणवठा होता. वाघाला पाणी प्यायला निर्धोकपणे जाता यावं म्हणून ड्रायव्हरनी गाडी पुढे घेऊन पाणवठ्यासमोर उभी केली. हा पाणवठा जणू एखादा रंगमंच असावा आणि आम्ही प्रेक्षक त्या नटाची वाट बघत थांबलो असू, असा तो वाघ.... सॉरी सॉरी ती वाघीण आपल्या दोन बच्च्यांसह डौलदार पावलं टाकत पाणवठ्यावर आली. पाण्याजवळ तोंड नेलं, पण पाणी प्यायली नाही अन् लगेच मागे वळूनही न पाहता निघून गेली. आम्ही बघतच राहिलो.
अद्भूत क्षण होते ते! डोळ्यांत साठवून घेतलेले, मनभरून बघून घेतलेले ते जंगलाच्या राजाचं रूप, त्याची ती सुखद भेट, मनात कोरल्या गेली.
ही भेट कायम स्मरणात राहील.…...
श्वेता पांडे - चिमोटे

No comments:
Post a Comment