Saturday, June 27, 2020

डॉ. आयडा स्कडर

पुस्तकाचे नाव - डॉ. आयडा स्कडर
लेखिका - वीणा गवाणकर
प्रकाशन - राजहंस प्रकाशन

मिशनरी धर्मप्रसारक कुटुंबात जन्मलेली एक मुलगी - आयडा! बालपणातील काही वर्षे हिंदुस्थानात काढल्यावर अमेरिकेत आपल्या आजोबांकडे गेली. अमेरिकेतच लहानाची मोठी झाली. शिकली. त्यादरम्यान तिची मिशनरी आई भारतातच तिदीवनम् (तामिळनाडूतील एक गाव) येथे राहून गावकऱ्यांना धर्माच्या गोष्टी सांगत होती तर वडील Dr. John Scuder वैद्यकीय सेवा पुरवत होते.
    आयडा वीस वर्षांची असताना तिच्या आईची तब्येत बिघडली. तिच्या आईची सेवा करायला म्हणून ती अमेरिकेतून भारतात आली. इथली गरीबी आणि उपाशी जनता तिला बघवत नव्हती. त्या सगळ्यांची घृणा वाटून तिला अमेरिकेत परत जायचे होते. तिने ठरवलं की आई बरी झाल्यावर आपण लगेच अमेरिकेत परतायचं. लग्न करायचं, आपला संसार थाटायचा. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 
 तिदीवनम् मध्ये कसेबसे दिवस रेटत असताना एका रात्री तिच्या दारावर थाप पडली. एक तामिळ ब्राह्मण युवक आपल्या चौदा वर्षांच्या गर्भवती पत्नीची सुटका करण्यासाठी एका स्त्री डॉक्टरच्या शोधात तिच्या दारी आला होता. तिने सांगितले की मी नाही पण माझे वडील डॉक्टर​ आहेत. नंतर एक मुस्लिम आला. त्याला आपल्या प्रसुती वेदनांनी तडफडणा-या पत्नीसाठी डॉक्टर महिलेची गरज होती. त्यानंतर गावचा प्रमुख मृत्युशय्येवर असलेल्या आपल्या पत्नीवर उपचारासाठी स्त्री डॉक्टरच्या शोधात तिच्या दारी आला होता. त्या तिघांनाही आयडाने सांगितले की तिचे वडील Dr. John Scuder त्या रुग्ण स्त्रियांवर उपचार करतील. मात्र आपल्या पत्नीला परपुरुषाने स्पर्श करण्यापेक्षा ती मेली तरी चालेल, असे त्या तिघांचेही ठाम मत होते.
आणि झालंही तसंच! एकाच रात्री तिदीवनम् अर्थात चिंचबनातील त्या तीन स्त्रिया केवळ महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याने मरण पावल्या. ह्याची प्रचंड टोचणी आयडाला व्यथित करु लागली. तिने दुसऱ्याच दिवशी सकाळी आईवडीलांना, ती अमेरिकेत जाऊन डॉक्टर होणार असल्याचं कळवलं. शिक्षण संपवून तिला भारतात परतायचं होतं, इथल्या स्त्रियांची सेवा करण्यासाठी!
  उदारमतवादी अमेरिकेतही त्याकाळी अविवाहित स्त्रीला डॉक्टर म्हणून मिशनरी कामावर पाठविण्यास विरोध होता. मात्र केट फ्रेलिंगसन नावाच्या एका बंडखोर स्त्रीनेच आयडाच्या जनसेवेसाठी medical college आणि मिशन बोर्डाशी वाद घालून तिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. शेवटी १८९६ साली आयडा 'women's medical college, Philadelphia' या अमेरिकेतील महिला डॉक्टर्स घडविणा-या आद्य संस्थेत प्रवेश घेतला. हेच ते महाविद्यालय जिथून भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी १८८० साली पदवी प्राप्त केली.
वैद्यकीय शिक्षणाचा पिंड नसलेल्या आयडाने केवळ आपले ध्येय डोळ्यांपुढे ठेवून हा अभ्यासक्रम परीश्रमपुर्वक पुर्ण केला. आपल्या तारुण्यसुलभ भावनाही तिने आपल्या ध्येयाच्या आड येऊ दिल्या नाही. आजन्म अविवाहित राहून तिने भारतीयांची सेवा केली. स्वतःच्या वाहनाने ग्रामीण भागातील रुग्णांना तपासण्यासाठी न थकता जात राहिली. फक्त वैद्यकीय सेवाच नाही तर भारतीय मुलींसाठी मेडिकल स्कूल ही सुरू केलं. 
पुढे वेल्लोर (तामिळनाडू) येथे सहशिक्षण असलेलं medical college ही सुरू केलं. ग्रामीण विभागात डॉक्टर्स नेण्याचा प्रयत्न जगात प्रथमच डॉ. आयडा स्कडर यांनी केला. त्यांना तत्कालीन इंग्रज सरकारने 'कैसर - ए - हिंद' हा किताब बहाल केला. 
डॉ. आयडा स्कडर म्हणतात," भ्रामक समजुती, अंधश्रद्धा, रुढी यांनी घेरुन असणा-या, परंपरेला बळी पडणाऱ्या लोकांना दोष देण्यात काय अर्थ? दोष असतो त्यांचा, ज्यांना उपाय माहीत आहेत पण ते अंमलात आणण्यासाठी जे दक्ष नाहीत त्यांचा!"
ह्या प्रेरणादायी चरित्राचा हिंदी अनुवाद प्रतिमा डिके यांनी "एक महान साधिका की कहानी" या नावाने केला आहे.
डॉ. आयडांबद्दल अतिशय कमी माहिती उपलब्ध असतानाही वीणा गवाणकरांनी हे चरित्र खूप परीणामकारकपणे मांडलंय.

© श्वेता चिमोटे.

No comments:

Post a Comment

मी संसार माझा रेखिते

  "दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेऽऽखिते..."   सुखी संसार मांडण्याची, तो नीटनेटका, आखीवरेखीव करण्याची स्वप्नं थोड्याफार फ...